
लातूर, 29 मार्च (हिं.स.)। उदगीर शहरात गोवंश जनावरांची अमानुष वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. दि. 29 मार्च रोजी पहाटे 2.53 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो (क्र. TS-12-UD-6838) मध्ये 13 गोवंश जनावरे अत्यंत कमी जागेत कोंबून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतूक केली जात होती. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चालक मेहताब महेबुब कुरेशी, वाहन मालक जाफर अहमद कुरेशी व जनावरांचा मालक मोहम्मद मुसा (सर्व रा. जहीराबाद, कर्नाटक) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976, प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 3.25 लाख रुपये किंमतीची 13 गोवंश जनावरे असा एकूण 6.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बंडे करत असून पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis