रायगड - बागदांड्यात वाढदिवस समारंभात हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रायगड, 29 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील बागदांडा येथे वाढदिवस साजरा करत असताना गैरसमजातून झालेल्या वादातून सहा जणांनी एकत्र येत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मांडवा (सागरी) पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे ब
रायगड - बागदांड्यात वाढदिवस समारंभात हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


रायगड, 29 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील बागदांडा येथे वाढदिवस साजरा करत असताना गैरसमजातून झालेल्या वादातून सहा जणांनी एकत्र येत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मांडवा (सागरी) पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे बागदांडा (पो. सारळ, ता. अलिबाग) येथील रहिवासी असून त्यांच्या घरात मुलीचा वाढदिवस साजरा सुरू होता. यावेळी फिर्यादी व साक्षीदार घरासमोर असताना आरोपींना फिर्यादीकडून शिवीगाळ होत असल्याचा गैरसमज झाला. या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर आरोपी क्रमांक 1 ते 6 यांनी बेकायदेशीर जमाव जमवून क्रिकेटची बॅट, स्टम्प, लाकडी फळी तसेच हाताबुक्यांनी फिर्यादी व इतरांवर हल्ला करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली.

या घटनेत आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी मांडवा (सागरी) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 34/2026 नुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande