
रायगड, 29 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील वेलशेत येथील रिलायन्स कंपनीच्या साईटवर पोकलँड मशीनचा महागडा पार्ट चोरीला गेल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेलशेत येथील नव्या कंपनी साईटवर एलअँडटी कंपनीत काम करणारा आरोपी, मूळ रहिवासी मटकुरिया (ता. कतरास रोड, जि. धनबाद, झारखंड), हा फिर्यादी यांच्या पोकलँड मशीन (कॅट 320) वर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
आरोपीने फिर्यादीच्या मालकीच्या पोकलँड मशीनमधील इंजिन कंट्रोल युनिट (ECU) हा सुमारे 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा महागडा पार्ट परवानगीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचा आरोप आहे. फिर्यादी हे घोटवडे (पो. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 67/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सानप करीत आहेत. या घटनेमुळे औद्योगिक साईटवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कामगारांची पार्श्वभूमी पडताळणी आणि यंत्रसामग्री सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)