
छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च (हिं.स.)।
शहरातील आठवडी बाजार बंद करण्याचा प्रस्ताव महापालिकेचे प्रशासनच सर्वसाधारण सभेत मांडणार आहे. आयुक्त जी. श्रीकांत यांनी या बद्दलची माहिती दिली आहे. प्रस्तावावर सर्वसाधारण सभा जे धोरण निश्चित करेल ते धोरण प्रशासनाकडून राबवले जाणार आहे.
स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त जी. श्रीकांत यांनी आठवडी बाजार बंद करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. आठवडी बाजार बंदच्या घोषणेबद्दल नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे आयुक्तांना आपल्या घोषणे बद्दल निवेदन करावे लागले. निवेदन करताना जी. श्रीकांत म्हणाले, आठवडी बाजार बंद करणार असे मी जे स्थायी समितीसमोर म्हणालो ते नीट
समजून घेणे गरजेचे आहे. शहरात ती आठवडी बाजार आहेत. त्याशिवाय शासनाच्या संकल्पनेतून शेतकरी आठवडी बाजार भरवण्यात येत आहेत. शहरात आठ ते नऊ ठिकाणी हे बाजार भरवले जातात. अलिकडच्या काळात भाजी विक्रेत्यांसाठी आपण मोठमोठे गाळे बांधले आहेत. या गाळ्यांमधूनच भाजी विक्री व्हावी अशी महापालिकेची भूमिका आहे.
आठवडी बाजारमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्या त्या ठिकाणी आठवडी बाजार भरणार नाही असा मानस आम्ही स्थायी समितीत व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis