
छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च (हिं.स.)।
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दोन वर्षानंतर अखेर 'उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था'ची यादी जाहीर केली. २०२२-२३ व २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील १७ औद्योगिक संस्था 'उत्कृष्ट आयटीआय'चा समावेश आहे. २०२३-२४ साठी जालन्यातील घनसावंगी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राज्यस्तरावर अव्वल ठरत उत्कृष्ट आयटीआय ठरली आहे. यासह भूम, बसमतनगर येथील आयटीआयनेही विभागीयस्तरीय उत्कृष्ट संस्थांच्या यादीत स्थान मिळविले. शंभर टक्के प्रवेश, गळतीचे प्रमाण शून्य टक्के अन् नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक रोजगार व स्वयंरोजगाराच्या बळावर राज्यस्तरावर मराठवाड्यातील
'आयटीआय'ने गुणवत्तेचा दबदबा निर्माण केल्याचे सांगण्यात येते.
आयटीआयमधून युवकांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण दिले जाते. अशा संस्थांसाठी २०१८ पासून राज्यस्तरावर 'उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार' देण्यात येतो. विविध निकषांनुसार निवड करून विभागीयसह राज्यस्तरावर उत्कृष्ट 'आयटीआय' निवडली जाते. यंदा २२-२३ साठी आठ पुरस्कार तर २३-२४ साठी नऊ पुरस्कार असे १७ आयटीआय उत्कृष्ट ठरल्या आहेत. त्यात विभागीय व राज्यस्तरावर या संस्था अव्वल ठरल्या.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis