
कोल्हापूर, 30 मार्च (हिं.स.)। महायुतीची सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया आज पार पडली. महाविकास आघाडीकडून भरलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर
बिनविरोध झालेल्या या निवडी मध्ये जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी सभापती पदासाठी महिलांना संधी दिली. यामध्ये सारिका यशवंत नांदेकर (शिंदेसेना) यांची बांधकाम आणि आरोग्य, शीतल प्रविण यादव (जनसुराज्य) यांची शिक्षण व अर्थ, विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) यांची महिला बालकल्याण तर श्रध्दा गायकवाड (यड्रावकर यांची शाहू आघाडी) यांची समाजकल्याण समिती सभापतीपदी निवड करण्यात आली.
महिला आणि बालकल्याण समिती वगळता सर्व विषय समिती समिती सभापती पदे पुरुष सदस्यांना देण्याची पद्धत यावेळी मोडून सर्व महिलांना संधी देण्यात आली.
महाविकास आघाडीने या चारही सभापदीपदांसाठी भरलेले अर्ज राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि आमदार सतेज पाटील यांच्या सुचनेनुसार मागे घेतले आणि बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
निवड सभेच्या पीठासन अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी काम पाहिले. यावेळी करवीर तहसिलदार स्वप्निल पवार, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar