पालघरमध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
पालघर, 30 मार्च (हिं.स.) : अमेरिका आणि इराकमधील युद्धस्थितीमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार तसेच पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे पालघर तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चि
अफवांमुळे पालघर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या रांगा


पालघर, 30 मार्च (हिं.स.) : अमेरिका आणि इराकमधील युद्धस्थितीमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार तसेच पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे पालघर तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

सफाळे, केळवा रोड, पालघर शहर, बोईसर आदी भागांतील पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून वाहनचालक इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात धाव घेत आहेत. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली आहे. या अफवांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, प्रशासनाने या सर्व अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतात कोणताही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीमुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे. कोणतीही माहिती पडताळणी केल्याशिवाय पुढे पाठवू नये, अन्यथा अनावश्यक तणाव निर्माण होऊन दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, पुरेसा साठा उपलब्ध असतानाही नागरिक भीतीपोटी अधिक प्रमाणात इंधन भरताना दिसत आहेत. पूर्वी दुचाकीमध्ये १०० ते २०० रुपयांचे इंधन भरणारे वाहनचालक आता थेट ५०० ते १००० रुपयांचे पेट्रोल भरत असून काही जण अतिरिक्त साठाही करत आहेत. परिणामी, काही ठिकाणी इंधन साठा तात्पुरता संपत असला तरी पुढील दिवशी पुरवठा सुरळीत होत असल्याचे दिसून येते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande