
अकोला, 31 मार्च (हिं.स.)। गॅस सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या माजी सरपंचाचा गर्दीत उभे अस र्ताना मृत्यू झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरराव फपुर्डाजी शिरसाट (८५), रा. अन्वी मिर्झापूर हे २८ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास गोरक्षण रोडवरील यदुराज गॅस एजन्सी येथे घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते शेजारील डॉ. श्रेयश अग्रवाल यांच्या दवाखान्यात स्वतः गेले. डॉ. अग्रवाल यांनी प्राथमिक तपासणी करून नातेवाइकांना माहिती दिली व रुग्णास हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त करत तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी त्यांना अकोला शहरातील सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी सुमारे ४.३० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेबाबत खदान पोलीस ठाण्यात मर्ग नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, गॅस एजन्सीवर कोणतीही गर्दी किंवा रांगेत नसल्याचे दिसून आले. तसेच मृतक हे उन्हात किंवा रांगेत उभे असल्याचेही आढळून आले नाही. यामुळे गर्दीत उभे राहिल्याने मृत्यू झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, याप्रकरणी पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे