
‘स्वच्छ व सुंदर बस स्थानक’ उपक्रमाला वेग
अकोला, 31 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान” अंतर्गत राज्यभर स्वच्छता आणि सुविधा सुधारणा उपक्रमांना गती मिळत आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानके स्वच्छ, सुंदर आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधायुक्त बनविणे हा आहे. महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे. बसस्थानक परिसरातील स्वच्छता, सुशोभीकरण, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीवर विशेष भर दिला जात आहे.
स्वच्छता स्पर्धांद्वारे प्रोत्साहन
या अभियानांतर्गत राज्यातील विविध एस.टी. आगारांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजित केल्या जात असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना दरवर्षी पारितोषिक देण्यात येते. शहरी, अर्धशहरी आणि ग्रामीण अशा गटांमध्ये विभागणी करून पुरस्कार दिले जातात, ज्यामुळे स्पर्धात्मकता वाढून स्वच्छतेला चालना मिळत आहे.
अकोला बस स्थानकात निरीक्षण
आज, 31 मार्च रोजी अकोला येथील मध्यवर्ती बस स्थानक (आगार क्रमांक 2) येथे स्वच्छता सर्वेक्षण पथकाने भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी स्वच्छता अभियानासाठी निर्धारित नियमांचे पालन होत आहे की नाही, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
निरीक्षण पथकात प्रादेशिक व्यवस्थापक (संभाजीनगर विभाग) सौ. अनघा बाराटक्के, विभागीय सांख्यिकी अधिकारी (नाशिक) सौ. कोकाटे, प्रवासी मित्र अमोल गीते तसेच पत्रकार सिद्धार्थ तायडे यांचा समावेश होता.
यावेळी बस स्थानक प्रमुख नरेश खंडारे, आगार व्यवस्थापक सुभाष भिवटे, यंत्र अभियंता पंकज धीवरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक चेतन मोरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संतोष लोखंडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर
या उपक्रमामुळे बस स्थानकांची स्वच्छता राखली जात असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या या प्रयत्नांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे