
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। जिंतूर पोलिस ठाण्यात खोट्या सहीच्या आधारे शाळेचे प्रवेश-निर्गम कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मनोज शिवराज मुळे (वय 40, व्यवसाय - मुख्याध्यापक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 318(4) व 3(5) अन्वये अब्दुल माजिद अब्दुल रहीम व अतीक रफीक पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींनी खोटी सही करून प्रवेश-निर्गम (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) तयार केल्याची ही घटना 2 जानेवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीद्वारे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर जिंतूर शहरात आणखी एका शाळेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवाहर विद्यालयातही अशाच प्रकारे खोट्या सहीच्या आधारे प्रवेश-निर्गम व अन्य कागदपत्रे तयार केल्याचा आरोप होत असून, त्या प्रकरणातही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. खोट्या सहीच्या आधारे फसवणूक करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis