
रायगड, 04 मार्च (हिं.स.) : राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोलसारख्या अविघटनशील साहित्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर कायद्याने बंदी असतानाही कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणावर विकली व वापरली जात आहेत. लग्नसमारंभ, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अशा फुलांचा वापर केल्यास संबंधित डेकोरेटर्स, दुकानदार तसेच मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल आणि मॅरेज हॉल चालकांवरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी सांगितले की, प्लॅस्टिक फुले, फुगे व दर्जाहीन खेळण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्याचा प्राणी, पक्षी व जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. या वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ व श्वसनाचे त्रास वाढत आहेत. काही रंगांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका संभवतो, असेही त्यांनी नमूद केले. कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, अविघटनशील कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नैसर्गिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे पर्यावरण विभाग अधिक काटेकोरपणे कारवाई करेल. गरज भासल्यास इतर विभागांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दादर फुल मार्केटमधील फुल विक्रेत्यांवरील अतिक्रमण कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विस्थापित फुल विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. फुलांचा व्यापार आणि बाजारपेठा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी संबंधित महानगरपालिकेला निर्देश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात कृत्रिम व प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून सातत्याने होत असून, आता सरकारच्या इशाऱ्यामुळे डेकोरेटर्स व हॉलचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके