बनमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करू- बच्चू कडू
अकोला, 04 मार्च (हिं.स.)।मेळघाटामधील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेला आज आक्रमक वळण मिळाले. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी जारीदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालत प्रशासनाचे लक्ष वेधले. वन
Photo


Photo


अकोला, 04 मार्च (हिं.स.)।मेळघाटामधील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेला आज आक्रमक वळण मिळाले. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी जारीदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालत प्रशासनाचे लक्ष वेधले. वनपरवानग्यांअभावी पाणी, रस्ता, वीज आणि आरोग्य सुविधांची कामे रखडल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रंगूबेली व परिसरातील पाच गावांसाठीची पाणीपुरवठा योजना वनविभागाच्या परवानगीअभावी रखडली असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. राणीगाव येथे जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असतानाही अंतिम टप्प्यात वनविभागाचा अडथळा निर्माण झाला आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचे काम पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे बच्चू कडू यांनी बैठकीत सांगीतले.

बोराट्याखेडा व रेहट्याखेडा येथे पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत; मात्र अवघ्या २०० मीटर पाइपलाईनसाठी वनपरवानगी न मिळाल्याने योजना अर्धवट अवस्थेत आहे. डोमी येथील रस्त्याचे कामही वनविभागाच्या मंजुरीअभावी थांबले आहे. चिलाटी, सुमिता व कुटीदा या गावामध्ये विजेचे पोल टाकण्यास परवानगी न मिळाल्याने आजही काही वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे.

इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात विहीर खणण्यासाठीही वनविभागाची परवानगी मिळत नाही, एकताई येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर असूनही बांधकामाला वनपरवानगी नसल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही, हे मुद्देही बैठकीत मांडण्यात आले.

या सर्व प्रश्नांवर प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बच्चू कडू यांनी सांगीतले. मात्र बैठकीतील मुद्द्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास थेट केंद्रीय वनमंत्री कींवा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.

मेळघाटातील विकासकामांमधील वनपरवानग्यांचा अडसर दूर करून आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा द्याव्यात, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असेही बच्चू कडू म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande