
राज्यातील ४६ केंद्रांवर तब्बल १५,६९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती
नाशिक, 04 मार्च (हिं.स.)। राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत राज्यातील 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३०९३ जागांसाठी रविवारी (दि.१) प्रवेश पूर्वपरीक्षा सुरळीत पार पडली. ४६ केंद्रांवर तब्बल १५,६९८ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहत परीक्षा दिली.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्ड संलग्न 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील इयत्ता सहावीच्या २,२२० तर इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ अशा ३०९३ जागांसाठी प्रवेश पूर्वपरीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यात नाशिक विभागातील ११९२, नागपूर विभागातील ९२३, ठाणे विभागातील ५८३ तर अमरावती विभागातील ३९५ जागांचा समावेश आहे. निर्धारित मुदतीत राज्यभरातून या परीक्षेसाठी तब्बल १६ हजार ४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी करत अर्ज सादर केले होते.
रविवारी (दि. १) झालेल्या प्रवेश पूर्वपरीक्षेला राज्यभरातील पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता सहावीसाठी सकाळी ११ ते दुपारी १ तर इयत्ता सातवी ते नववीसाठी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेट देत पाहणी केली. परीक्षेतील संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी चारही अपर आयुक्त कार्यालयाकडून चोख नियोजन करण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रांवर प्रथमोपचार पेटी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
*चौकट*विभागनिहाय उपस्थित परीक्षार्थीनाशिक- ७३५३नागपूर- ३८९२ठाणे- २०१०अमरावती- २४४३
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV