नाशिक - वर्ल्ड स्कील कॉम्पिटीशनच्या प्रादेशिक स्तरावरील पदक विजेत्यांचा सन्मान
नाशिक, 04 मार्च, (हिं.स.)। कौशल्याच्या क्षेत्रातील ऑलिम्पिक स्पर्धा मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड स्किल कॉम्पिटशनसाठी प्रादेशीक पात्रता फेरीत सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केलेल्या नाशिकच्या तिघा विद्यार्थ्यांना क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्यावतीने महापौर
Regional level medal winners


नाशिक, 04 मार्च, (हिं.स.)। कौशल्याच्या क्षेत्रातील ऑलिम्पिक स्पर्धा मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड स्किल कॉम्पिटशनसाठी प्रादेशीक पात्रता फेरीत सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केलेल्या नाशिकच्या तिघा विद्यार्थ्यांना क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्यावतीने महापौर सौ. हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. ‘या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय फेरीतही असेच यश मिळवून स्किलींगच्या जागतीक क्षितीजावर नाशिकचे नाव झळकवावे’, अशा शब्दात महापौर आडके यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि दिव-दमण येथील विद्यार्थ्यांमध्ये वर्ल्ड स्किल कॉम्पिटीनशनसाठी झालेल्या प्रादेशिक पात्रता फेरीत महाराष्ट्र हे सर्वाधिक पदके मिळविणारे राज्य ठरले. त्यात नाशिकच्या हर्ष पवारने थ्रीडी डिजीटल गेम आर्टमध्ये आणि पियुषकुमार पंढीयारने सीएनसी मायनिंगमध्ये सुवर्ण पदके मिळवली. तर आरती मोरे हीने पेंटींग आणि डेकोरेटींगमध्ये रौप्य पदक मिळवले. क्वालिटी सिटीचे समन्वयक श्री. जितेंद्र ठक्कर, सहसमन्वयक . हेमंत राठी, ललित बूब आणि मनिष रावल यांच्या उपस्थीतीत महापौरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रदाने करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची प्रेरणा जागविणे आणि त्यासाठी अनुकूल संसाधने उपलब्ध करून देणे, या उद्देश्याने दर दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या वर्ल्ड स्किल कॉम्पिटीशनमध्ये २३ वर्षांखालील विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. भारत सरकारच्या स्कील इंडिया पोर्टलद्वारे नोंदणी केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व हावेत म्हणून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी प्रयत्नशील असते. यंदा क्वालिटी सिटी अभियानाची जोड मिळाल्याने नाशिकमधून विक्रमी संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. राज्यभरातून या स्पर्धेत १५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून ११८ विद्यार्थी पश्चिम क्षेत्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले. त्यात महाराष्ट्र १९ सुवर्ण, २४ रौप्य, १५ कांस्य आणि ८ विशेष अशी सर्वाधिक पदके मिळवून अव्वल ठरला. विविध क्षेत्रीय स्पर्धांमधून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय निवड फेरी होईल. त्यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या ४८ व्या वर्ल्ड स्कील कॉम्पिटीशनमध्ये ७० देशांतील १४०० स्पर्धकांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande