
रायगड, 05 मार्च (हिं.स.) : अलिबाग बायपासवर एका पर्यटकांच्या कारला अचानक आग लागली, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार अमित साळुंखे यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील काही पर्यटक अलिबाग येथे पर्यटनाचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले होते. अलिबाग बायपास परिसरात त्यांच्या मारुती विटारा ब्रेझा कारमधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत सर्व प्रवासी तात्काळ गाडीतून बाहेर पडले, आणि काही क्षणातच कारने आग पकडली.
यावेळी बायपास परिसरात तैनात असलेल्या पोलीस हवालदार अमित साळुंखे यांनी तत्परता दाखवत त्वरित मदतकार्य सुरू केले. त्यांनी अलिबाग नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावले आणि रस्त्यावरील वाहने सुरक्षित ठिकाणी थांबवून वाहतूक वळवण्याची व्यवस्था केली.
अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचताच आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली आणि वाहतूक सुरळीत सुरू केली.
या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस हवालदार अमित साळुंखे यांच्या धाडस आणि कार्यकुशलतेबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके