
रायगड, 05 मार्च (हिं.स.) : एकेकाळी भात उत्पादनासाठी ओळखला जाणारा रायगड जिल्हा आता भातशेती घटण्याच्या गंभीर संकटाला सामोरा आहे. गेल्या काही वर्षांत शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि महामार्ग प्रकल्पांमुळे शेतीयोग्य जमीन कमी होत चालली असून याचा थेट परिणाम भात उत्पादनावर होत आहे.
यंदा जिल्ह्यात प्रति हेक्टर तांदळाचे उत्पादन केवळ २०८१.३२ किलो इतके नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट दर्शवते. रायगडमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते आणि येथील हिरवीगार भातशेती हा जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे.
पूर्वी रायगडमध्ये सुमारे १ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते, २०१८-१९ पर्यंत हे क्षेत्र १ लाख ११ हजार हेक्टरवर आले, तर यंदा फक्त ८३ हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाड, रोहा, पाताळगंगा, रसायनी, खोपोली, खालापूर, माणगाव आणि तळोजा या भागांत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. तसेच मुंबई–गोवा आणि मुंबई–पुणे महामार्गांसह विविध महामार्ग प्रकल्पांमुळे हजारो हेक्टर जमीन भूसंपादित झाली आहे. भविष्यात प्रस्तावित रेवस–रेड्डी मार्ग तसेच अलिबाग–विरार कॉरिडॉर प्रकल्पांमुळे शेती क्षेत्र आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय जिल्ह्यात सिंचन सुविधांचा अभाव मोठी समस्या आहे. केवळ सुमारे ७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे, त्यामुळे बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्ती, अवेळी पाऊस आणि शेतीत वाढता खर्च यामुळे शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी जमिनीचे वाढते बाजारमूल्य आणि नवीन पिढी शेतीकडे वळत नसल्यामुळे भातशेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे आणि भविष्यात भातशेती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके