
रायगड, 08 मार्च (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील आंबीवली फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दुचाकी चालविणारा मुलगाही जखमी झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास आंबीवली फाटा येथील निसर्ग हॉटेलजवळ हा अपघात घडला. आरोपी हा त्याचे वडील यांना सुपर स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच ४६ ए वाय १९३०) वर डबलसीट बसवून खोंडेवाडी येथून कर्जतकडे जात होता.
दरम्यान, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे दुचाकी चालवित असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गायीला मोटारसायकलची जोरदार धडक बसली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात मागे बसलेल्या वडिलांच्या डोक्याला तसेच हात-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकी चालक मुलगाही किरकोळ जखमी झाला असून मोटारसायकलीचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११८/२०२६ अंतर्गत मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार लालासाहेब तोरवे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)