
लातूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे हाडोळती येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक (डीजे) वाजवल्याप्रकरणी अहमदपूर पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी लातूर आणि पोलीस प्रशासनाने ध्वनीक्षेपकाबाबत दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास हाडोळती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यान आरोपी परमेश्वर अंतोबा कांबळे, विपुल नरहरी कांबळे, जियक वैजनाथ कांबळे, अक्षय निळकट कांबळे, सुरज शरद मारकोळे (सर्व रा. हाडोळती) आणि मेघराज पांचुलाल तांबोळी (रा. मुरूड, जि. लातूर) यांनी मा. जिल्हाधिकारी लातूर व पोलीस निरीक्षक अहमदपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मानद मर्यादेपेक्षा अधिक आवाजाच्या ध्वनीक्षेपकाचा वापर केला. सार्वजनिक शांततेचा भंग होईल अशा पद्धतीने कृत्य केल्याने या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय व्यंकटराव इंद्राळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/२०२६, कलम २२३ बीएनएस (BNS) आणि १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (कलम ३७ (३) चे उल्लंघन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार येमले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही कडक कारवाई करण्यात आल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis