अहमदपूर पोलिसांची सतर्कता; बसस्थानकातील गर्दीत महिलेच्या मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला
लातूर, 16 एप्रिल (हिं.स.)। अहमदपूर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अयशस्वी ठरला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने चक्रे फिरवून नाकेबंदी केल्यामुळे चोरट्याला दागि
चोरीचा प्रयत्न उधळला


लातूर, 16 एप्रिल (हिं.स.)। अहमदपूर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अयशस्वी ठरला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने चक्रे फिरवून नाकेबंदी केल्यामुळे चोरट्याला दागिना घेऊन पळता आले नाही आणि संबंधित महिलेला तिचे दागिने सुखरूप परत मिळाले.

दि. १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अहमदपूर बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील रहिवासी सावित्राबाई विठ्ठल निरगुडे या अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तोडले. मंगळसूत्र तुटल्याचे लक्षात येताच सावित्राबाईंनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

त्याच वेळी बसस्थानक परिसरात 'फिक्स्ड पॉईंट' ड्युटीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर चपडे हे आपल्या पथकासह सतर्कतेने गस्त घालत होते. आरडाओरड ऐकताच त्यांनी होमगार्ड कर्मचारी अमोल मुंडे, विलास कांबळे, बळीराम पोले आणि महिला होमगार्ड नीता सोळंके यांच्या मदतीने बसच्या आजूबाजूला वेढा घातला.

पोलिसांनी तात्काळ परिसराचे निरीक्षण करून कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही. पोलिसांच्या या कडक पवित्र्यामुळे चोरट्याला मंगळसूत्र घेऊन जाणे अशक्य झाले. त्यानंतर पाहणी केली असता, तुटलेल्या अवस्थेतील मंगळसूत्राचे मणी महिलेच्या जवळच सापडले. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे पिंपळदरी येथील या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे.

अहमदपूर पोलिसांच्या या चोख कामगिरीबद्दल सावित्राबाई निरगुडे यांनी पोलिसांचे आभार मानले असून, प्रवाशांकडून पोलीस पथकाचे विशेष कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande