अहमदपूर - सापळा लावून पकडला २ लाख ७० हजारांचा सुगंधित गुटखा
लातूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांच्या आणि गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळकोटहून अहमदपूरकडे कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर,
पोलीस कारवाई


लातूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांच्या आणि गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळकोटहून अहमदपूरकडे कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात सापळा लावून एका कारसह १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. शिरूर ताजबंद येथे गस्त घालत असताना, जळकोट बाजूकडून एका पांढऱ्या रंगाच्या इंडिगो कारमध्ये (क्र. एम.एच.१२ एल.पी.५७५०) प्रतिबंधित गुटखा येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडोळती बसस्थानक परिसरात नाकेबंदी केली. संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, कारच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये पांढऱ्या व खाकी पोत्यात लपवून ठेवलेला विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.

या कारवाईत १ लाख २४ हजार ८०० रुपयांचा विमल पानमसाला, ३१ हजार २०० रुपयांची व्ही-१ तंबाखू, १४ हजार ४०० रुपयांचा डायरेक्टर स्पेशल मसाला व तंबाखू आणि १ लाख रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कार चालक आल्लाबक्ष इलाही तांबोळी (वय ३० वर्षे, रा. मारवाडी गल्ली, अहमदपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, पोलीस हवालदार तानाजी आरदवाड, गंगाधर चपडे, हरी कांबळवाड , दत्तात्रय इंदाळे,विशाल सारोळे ,पद्माकर पांचाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande