लातूर - गांधी चौक व भादा हद्दीत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
लातूर, 08 मार्च, (हिं.स.)। रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात दोन ठिकाणी कारवाई करत देशी व विदेशी दारूचा मोठा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारू
पोलीस कारवाई


लातूर, 08 मार्च, (हिं.स.)। रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात दोन ठिकाणी कारवाई करत देशी व विदेशी दारूचा मोठा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने गांधी चौक पोलीस ठाणे व भादा पोलीस ठाणे हद्दीत स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.

गांधी चौक परिसरात 234 बाटल्या जप्त

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर गंज गोलाई, साठे चौक, गांधी मार्केट, गूळ मार्केट व गावभाग चौक परिसरात पोलिसांकडून फिक्स पॉईंट बंदोबस्त, मोटारसायकल व जीप पेट्रोलिंग सुरू होते.

दरम्यान गंज गोलाई परिसरातील मेजवानी बारसमोर, बॉस टपरीजवळ व घंटे लॉज परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत 234 देशी दारूच्या बाटल्या (एकूण किंमत ₹11,700) जप्त करण्यात आल्या असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भादा हद्दीत हॉटेलवर छापा

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष पथकाने भादा पोलीस ठाण्याच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करत औसा तालुक्यातील हिप्परगा शिवारातील बेलकुंड-देवताळा रोडवरील ‘अरुष हॉटेल’वर छापा टाकला.

या ठिकाणी भुजंग मारुती चव्हाण (वय 27, रा. एकंबीवाडी, ता. औसा) हा विनापरवाना देशी व विदेशी दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले. छापेमारीदरम्यान हॉटेलच्या किचनमधून विविध कंपन्यांच्या देशी-विदेशी दारू व बिअरचा ₹23,390 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे व साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande