
बीड, 14 एप्रिल (हिं.स.) - बीड शहरातील एका खाजगी वसतिगृहातून पळालेल्या दोन मुलींना शिवाजीनगर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत शिरूर घोडनदी येथून सुखरूप ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. या मुली वेबसिरीज आणि कोरियन संस्कृतीच्या आकर्षणापोटी स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यात पळाल्या होत्या. मुलींनी भिंतीगत असलेल्या झाडाच्या साहाय्याने कंपाउंडवरून उडी मारून पळ काढला होता. मुलींकडे मोबाईल नव्हता, मात्र प्रवासादरम्यान बस वाहकाच्या मोबाईलवरून त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला, ज्यामुळे पोलिसांनी त्यांचे अचूक लोकेशन कळाले.
पोलिसांनी तातडीने पथक पाठवून ही कारवाई केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. संगणक क्लास करणाऱ्या या मुलींमध्ये कोरियाबद्दल विशेष आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis