वैष्णवी आडकरला W35 ITF टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद
बंगळुरु, 08 मार्च (हिं.स.)कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या W35 ITF स्पर्धेत अंतिम फेरीत अंकिता रैनाचा पराभव करून वैष्णवी आडकरने तिच्या कारकिर्दीतील दुसरे आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले. दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी,
वैष्णवी आडकर


बंगळुरु, 08 मार्च (हिं.स.)कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या W35 ITF स्पर्धेत अंतिम फेरीत अंकिता रैनाचा पराभव करून वैष्णवी आडकरने तिच्या कारकिर्दीतील दुसरे आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले.

दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी, दोन्ही टेनिसपटूंनी दोन तास आणि १४ मिनिटे संघर्ष केला आणि त्यानंतर ३३ वर्षीय अंकिताला तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या वैष्णवीकडून ७-६(३), ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला.माझ्यासाठी हा आठवडा खूप चांगला होता, परिस्थिती खूप कठीण होती आणि मला अभिमान आहे की, मी या परिस्थितीत शेवटच्या सामन्यापर्यंत धडपड करू शकलो. मी लहान असल्यापासून अंकिताला उच्च पातळीवर खेळताना पाहिले आहे. म्हणून, तिच्याशी स्पर्धा करणे, तिच्यासोबत दुहेरी खेळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला माहित होते की, ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना सोडत नाही. म्हणून, मला प्रत्येक टप्प्यावर लढत राहावे लागले आणि मी ते करू शकले, असं वैष्णवी तिच्या विजयानंतर म्हणाली.

वैष्णवीच्या सर्व्हिसवर सेट पॉइंट असूनही तिला सलामीचा सामना ६-५ असा जिंकता आला नाही. तरीही, या तरुणीने टायब्रेकमध्ये वर्चस्व गाजवत स्पर्धेत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेत वैष्णवीने अंकिता आणि तिच्यात काही अंतर ठेवले असे दिसले. पण तीन वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळणाऱ्या अंकिताने बरोबरी साधण्यासाठी जोरदार पुनरागमन केले. पण वैष्णवीने अंकिताला मागे टाकून विजेतेपद पटकावले.

गेल्या महिन्यात पुण्यातील वैष्णवीने बेंगळुरूमध्ये उपविजेतेपद पटकावले होते आणि २००९ मध्ये सानिया मिर्झा नंतर W100 किंवा त्याहून अधिक स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.कलबुर्गीमधील विजयासह जागतिक क्रमवारीत ४६४ व्या स्थानावर असलेल्या वैष्णवीने ४,८६० अमेरिकन डॉलर्स आणि ३५ रँकिंग गुण मिळवले. लाईव्ह रँकिंगमध्ये, तिने ३९६ या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानावर झेप घेतली आहे. जी भारताच्या क्रमांक १ सहजा यमलापल्लीपेक्षा फक्त तीन स्थानांनी खाली आहे.पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या बिली जीन किंग कप आशिया-ओशनिया स्पर्धेसाठी वैष्णवी आणि अंकिता या दोघांनाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande