
रायगड, 13 एप्रिल (हिं.स.)। सुहित जीवन ट्रस्ट संचालित एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सांगली येथे आयोजित १५ वी क्लासिक सब-ज्युनिअर, ज्युनिअर व स्पेशल चाइल्ड पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.
या स्पर्धेत कु. जितेश साजेकर यांनी ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले, तर कु. यश पांगत यांनी ६६ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेसह रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशात हनुमान व्यायाम शाळेचे प्रशिक्षक राजेश अनगत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच संस्थेतील शिक्षक अमोल काईनकर, मुख्याध्यापक, पालक व विश्वस्त यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुहित परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)