
अकोला, 09 मार्च (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’, ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत अलीकडे राबविण्यात आलेल्या कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करण्यामध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत गाडी क्रमांक 17630 नांदेड–हडपसर एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाईत उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक 04 जवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 17.57 ग्रॅम वजनाची, अंदाजे ₹43,700 किंमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली असून ती पुढील तपासासाठी सरकारी रेल्वे पोलिस (GRP) यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
याशिवाय पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि तीन धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ₹1.80 लाख आहे. आरोपींना जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 02 वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संबंधित आरोपीला जीआरपी परभणी यांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ अंतर्गत अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे सिग्नलिंग केबल चोरीची घटना टळली. प्लॅटफॉर्म क्रमांक 06 जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 10 मीटर सिग्नलिंग केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींना रेल्वे संपत्ती (बेकायदेशीर ताबा) अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
तसेच ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी घरातून पळून जाऊन रेल्वेत चढलेल्या 17 वर्षीय मुलाची सुटका केली. समुपदेशनानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे करण्यात आले.
या यशस्वी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे संपत्तीचे संरक्षण आणि सुरक्षित रेल्वे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांची सततची सतर्कता आणि बांधिलकी अधोरेखित होत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे