
अकोला, 09 मार्च (हिं.स.) । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या घटनेदरम्यान सुमित रवींद्र मुर्तडकर या विद्यार्थ्याने महाविद्यालयातीलच दीप गणेश साबळे (वय १७) या विद्यार्थ्याला हातातील कड्याने मारहाण केली. या मारहाणीत दीप साबळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर काही काळ महाविद्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची दखल घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे.
वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची हाणामारी झाल्याने महाविद्यालयातील शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे