
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी मुंबई येथील प्रदेश कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत महासचिव पदी जावेद हिदायत पटेल यांची निवड झाल्याने अकोट तालुकासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
या विस्तृत कार्यकारिणीत १२४ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अकोल्यातील जावेद हिदायत पटेल यांना महासचिव म्हणून जबाबदारी मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे.
जावेद हिदायत पटेल यांनी यापूर्वी युवक काँग्रेसच्या महत्वाच्या पदावर यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. ते अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका, मोहाळा येथील रहिवासी असून, संघटनेत त्यांनी स्वकर्तृत्वावर ठसा उमटवला आहे. नुकतेच त्यांनी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर अविरोध निवड मिळवली आहे.
महासचिव पदी नियुक्तीबाबत बोलताना जावेद हिदायत पटेल म्हणाले की, “पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्याला अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.” त्यांनी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, सहप्रभारी नवज्योत सिंग संधू तसेच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचे आभार मानले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे