अकोला: श्री महारुद्र मारुती संस्थान विदर्भातील महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील देवरण येथील श्री महारुद्र मारुती संस्थान भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते. प्राचीन परंपरा, धार्मिक महत्त्व आणि भक्तांची अखंड निष्ठा यामुळे हे देवस्थान विदर्भात विशेष ओ
Photo


अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील देवरण येथील श्री महारुद्र मारुती संस्थान भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते. प्राचीन परंपरा, धार्मिक महत्त्व आणि भक्तांची अखंड निष्ठा यामुळे हे देवस्थान विदर्भात विशेष ओळख निर्माण करत आहे.

जुनिवास्ती भागात वसलेले हे मंदिर सुमारे १७व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिरातील मारुतीची मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केल्याची आख्यायिका आहे, ज्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाविकांमध्ये अशी दृढ श्रद्धा आहे की येथील महारुद्र मारुती अत्यंत जागृत असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे देवरण किंवा मूर्तिजापूरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातून आणि राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्याला हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच प्रत्येक शनिवार आणि मंगळवारी नियमित भजन व महाप्रसादाचे आयोजन होते, ज्यादिवशी भक्तांची विशेष गर्दी पाहायला मिळते.

श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेले श्री महारुद्र मारुती संस्थान आज विदर्भातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande