
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.)।अहिल्यानगर येथे रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाकडे तक्रार पाठवली आहे.
जावेद जकरिया यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशन, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संग्राम जगताप हे कथितपणे एका मशीदेसमोर नाचत-गाताना तसेच मशिदीकडे बाण सोडण्यासारखे इशारे करताना दिसत आहेत. त्यांच्या मते अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजात धार्मिक तणाव आणि वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
जकरिया यांनी सांगितले की महाराष्ट्रात सर्व धर्मांचा सन्मान आणि सामाजिक सौहार्दाची परंपरा आहे. अशा परिस्थितीत एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे हा गंभीर विषय असून प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी.
तसेच यापूर्वी दिवाळीच्या काळात आमदार संग्राम जगताप यांनी “फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा” अशी घोषणा केल्याच्या प्रकरणात जावेद जकरिया यांनी अकोला न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल 2026 रोजी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जकरिया यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 153A, 295A आणि 505(2) अंतर्गत कारवाई होऊ शकते. कारण या कलमांमध्ये धर्माच्या आधारावर वैमनस्य पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि विविध समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणे यासंबंधी तरतुदी आहेत.
समाजात शांतता आणि सौहार्द टिकून राहावे यासाठी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जकरिया यांनी प्रशासनाकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे