अकोला महसूल मंत्र्यांच्या हस्ते महाराजस्व समाधान अभियानाचा शुभारंभ
अकोला, 10 एप्रिल (हिं.स.) : लोकाभिमुख व पारदर्शी प्रशासनाची दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर आधारित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे कार्य अखंडपणे करत राहील, असे प्रतिपादन
Photo


Photo


अकोला, 10 एप्रिल (हिं.स.) :

लोकाभिमुख व पारदर्शी प्रशासनाची दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर आधारित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे कार्य अखंडपणे करत राहील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मुर्तीजापूर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार, सरपंच राजू कैथवास, नगराध्यक्ष हर्षल साबळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, या अभियानांतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचा लाभ प्रत्येक नागरिकाने घ्यावा. अकोला जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागासाठी 100 खासगी सर्व्हेअर नेमण्यात येणार असून त्यामुळे शेतजमिनींची मोजणी अधिक वेगाने होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत शेतरस्त्यांचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणही केले जाणार आहे. पट्टेवाटपाच्या निर्णयानुसार केवळ 1000 रुपयांत नोंदणी केली जाणार असून पोटहिस्स्याच्या मोजणीसाठी फक्त 200 रुपये शुल्क आकारले जाईल.

शेती मोजणी प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षांत अर्ज केल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आमदार हरीश पिंपळे यांनी तुकडेबंदी कायद्यातील सुधारणांमुळे लहान भूखंडांच्या मालकी हक्कातील अडथळे दूर झाल्याचे सांगितले. तर वसंत खंडेलवाल यांनी झोपडपट्टी पुनर्वसन आणि ‘सर्वांसाठी घरे’ या योजनांमुळे नागरिकांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच महसूल मंत्र्यांनी लक्षेश्वर महादेव संस्थान येथे दर्शन घेतले आणि लाखपुरी येथील रस्त्याचे लोकार्पण केले.-----------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande