
अकोला, 10 एप्रिल (हिं.स.):महापालिकेत विरोधी गटातील 16 नगरसेवकांच्या निलंबनानंतर शुक्रवार (दि.10 एप्रिल) रोजी झालेल्या सभेवर विरोधी गटाने बहिष्कार टाकत महापालिका परिसरातच विरोधी पक्षनेत्याच्या कक्षासमोर प्रतिकात्मक सभा घेतली. या सभेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
विरोधकांनी घेतलेल्या या प्रतिकात्मक सभेत सत्ताधारी गटावर भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि निधी वाटपात भेदभाव केल्याचे आरोप करण्यात आले. तसेच निलंबित 16 नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याची मागणीही करण्यात आली.
या सभेत प्रतीकात्मक स्वरूपात महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर खान, तर उपमहापौरपदी वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांनी नगर सचिवाची भूमिका बजावली.
सभेत विविध मुद्द्यांवर तीव्र टीका करण्यात आली. घरकुल योजनेसाठी नेमण्यात येणाऱ्या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली, जी प्रतीकात्मक महापौरांनी मंजूर केल्याचे दाखवण्यात आले.
कचरा घंटागाडी व्यवस्थापनावरही विरोधकांनी आक्षेप घेत नागरिकांकडून शुल्क आणि महापालिकेकडून दिले जाणारे अनुदान यावर प्रश्न उपस्थित केले. ही सेवा मोफत करण्याची मागणीही करण्यात आली.
विरोधकांनी पत्रकारांच्या उपस्थितीचा मुद्दाही उपस्थित करत सभागृहात माध्यम प्रतिनिधींना बसण्यास न दिल्याचा आरोप केला. तसेच पारदर्शकतेसाठी पत्रकारांसाठी जागा राखीव ठेवण्याची भूमिका मांडली.
निधी वाटपात समानता ठेवावी, सर्व नगरसेवकांना समान निधी द्यावा, अशी मागणीही या सभेत करण्यात आली. काही नगरसेवकांनी मालमत्ता कराच्या मुद्द्यावरही लक्ष वेधत भेदभाव झाल्यास करदरातही समानता असावी, अशी मागणी केली.
संपूर्ण सभेत सत्ताधारी गटाच्या कामकाज पद्धतीवर विरोधकांनी जोरदार टीका करत व्यंगात्मक पद्धतीने खिल्ली उडवली. या अनोख्या प्रतिकात्मक सभेमुळे शहरात या राजकीय घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे