
पुणे, 10 एप्रिल (हिं.स.) । ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम बनवून त्यांना “महाराष्ट्राचा आर्थिक कणा” करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेली ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ ही पशुपालकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात आयोजित ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ सादरीकरण व अंमलबजावणी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पशुपालनाकडे केवळ पारंपारिक व्यवसाय म्हणून न पाहता, एक व्यावसायिक उद्योजकतेची संधी म्हणून पाहण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुजन्य उत्पादनांची उत्पादकता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांची पारदर्शक निवड, गैरप्रकारांना आळा आणि जनजागृती यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, लाभ वितरणासाठी लवकरच राज्यस्तरीय भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पशुसंवर्धन क्षेत्रातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता विकसित होत असून या क्षेत्राला उद्योजकाचा दर्जा देण्याची गरज आहे. शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन यांसोबतच वराहपालन व्यवसायालाही चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच अंड्याचा ब्रँड निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. “एक जिल्हा, एक उत्पादन” या संकल्पनेवर पशुसंवर्धन क्षेत्रात काम करण्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांची उभारणी आणि मनुष्यबळ उपलब्धता यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण, ‘महा पशुधन वार्ता’ मासिकाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु