
रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : सरत्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागामध्ये एकूण २ लाख ३४ हजार ९४० नवीन खाती उघडून रत्नागिरी विभागाने गोवा विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, आज स्पर्धेच्या युगातही जनसामान्यांचा टपाल खात्यावरील असलेला विश्वास हीच टपाल खात्याची खरी ताकद आहे. डोंगराळ प्रदेश, भौगोलिक वैविध्य, बहुतांश ग्रामीण भाग, तेथील लोकांचे उत्पन्न या सगळ्या अडचणींवर मात करून रत्नागिरी विभागाने मोलाची कामगिरी केली आहे. 2023-24 मध्ये रत्नागिरी विभागामध्ये 1 लाख 31 हजार 996, 2024-25 मध्ये 1 लाख 45 हजार 903 नवीन खाती उघडण्यात आली होती. सरत्या वर्षात ही आकडेवारी दुप्पट झाली आहे.
मार्च 2024ला रत्नागिरी विभागामध्ये एकूण 9 लाख 72 हजार 108 एवढी खाती सुरू होती. मार्च 2025च्या अखेरीस 10 लाख 37 हजार 712 एवढी खाती चालू होती. मार्च 2026 च्या अखेरीस हा आकडा 11 लाख 82 हजार 229 वर पोहोचला आहे. यापुढेही ग्राहकांनी पोस्ट खात्याच्या जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्यावा आणि पोस्ट खात्यावरील आपला विश्वास अढळ ठेवावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक कुलकर्णी यांनी केले आहे.
योजनांनिहाय चालू खात्यांची आकडेवारी
▪️बचत खाते- 3 लाख 73 हजार 523
▪️ रिकरिंग खाते (आरडी)- 4 लाख 38 हजार 14
▪️मुदत ठेव- 2 लाख 47 हजार 630
▪️सुकन्या समृद्धी योजना- 72 हजार 857
▪️पीपीएफ- 15 हजार 768
▪️वरिष्ठ नागरिक योजना- 14 हजार 529
▪️मासिक उत्पन्न योजना- 19 हजार 710
▪️राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (87)- 166
▪️राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (92)- 32
▪️एकूण - 11 लाख 82 हजार 229
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी