
अकोला, 11 एप्रिल (हिं.स.)।महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून, महिला व बालकांसाठीच्या योजनांना गती मिळणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.२३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे