प्रत्येक दिव्यांगांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न - लातूर सीईओ
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)। ऑटीझम आजारावर वेळेत उपचार केल्यास रुग्णांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असून शासनाचे धोरण दिव्यांगांना सक्षम बनविण्याचे आहे. प्रत्येक दिव्यांगाला सक्षम बनविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प
राहुल मीना


लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)। ऑटीझम आजारावर वेळेत उपचार केल्यास रुग्णांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असून शासनाचे धोरण दिव्यांगांना सक्षम बनविण्याचे आहे. प्रत्येक दिव्यांगाला सक्षम बनविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत, पुणे) संचलित संवेदना दिव्यांग प्रकल्प आणि सक्षम नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हरंगूळ (बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयात आयोजित “ऑटीझम” विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण समितीचे प्रांत उपाध्यक्ष विश्वनाथ जालनापूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणेचे प्रतिनिधी भारत कांबळे, निपिडच्या मुख्य समन्वयक सुनिता देवी, डी.डी.आर.सी.चे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, मार्गदर्शिका डॉ. सुरेखा जोशी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मीना यांनी सांगितले की, शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे “दिव्यांग सक्षमीकरण” असे नामकरण करण्यात आले असून यामागे दिव्यांगांना अधिक सक्षम करण्याचा स्पष्ट उद्देश आहे. डॉक्टर आणि पालक हे ऑटीझमग्रस्त मुलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे दुवा असून त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवता येतो. जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून हिमोफिलिया आणि ऑटीझमसारख्या २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी उपकरणे, साहित्य, उपचारासाठी अनुदान तसेच संस्थांना मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. राजेश पाटील यांनी रक्तदोष आणि ऑटीझम हे सहज लक्षात न येणारे आजार असून त्यांच्याविरोधात संघटितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनीही ऑटीझमविषयी जागरूकता वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात विश्वनाथ जालनापूरकर यांनी संवेदना संस्थेच्या १४ प्रकल्पांद्वारे कार्य सुरू असून भविष्यात सेरेब्रल पाल्सीसाठी ९ तपासणी केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रातील संगीतोपचार कक्ष व संगणक कक्षाचे उद्घाटन राहुल कुमार मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निरामय आरोग्य कार्ड वितरण, संगीत परीक्षा उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नुकतेच निपिडवर सदस्य म्हणून निवड झालेल्या व्यंकट लामजणे यांचा गौरव करण्यात आला.

240 विशेष शिक्षक व पालकांचा सहभाग

या कार्यशाळेत राज्यभरातील 240 विशेष शिक्षक व पालकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेत ऑटीझम विषयावरील विविध चर्चासत्रे, समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande