नांदेडमधील केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर
- शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)। मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान स
नांदेडमधील केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर


- शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)।

मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला असून, या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांची भेट घेऊन या विषयाशी त्यांना अवगत केले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य

ओळखून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच विधानसभेत व राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. शेतकरी प्रतिनिधी तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश देशमुख (बारडकर) यांनी मुंबईत झालेल्या शासकीय बैठकीत या विषयावर ठोस पुराव्यांसह मांडणी करत शेतकऱ्यांचा दावा न्याय्य असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, स्वयंचलित हवामान केंद्रातील तापमानांच्या नोंदीतील विसंगती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी य प्रकरणात हस्तक्षेप करत पुनर्विचाराचे आदेश दिले आणि अखेर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला. यापूर्वी केवळ ३२ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते; मात्र पुनर्विचारानंतर आता बारड, मुदखेड, मालेगाव, मुगट, दाभड परिरातील शेतकऱ्यांना उच्च व निम्न तापमानासाठी हेक्टरी ७४ हजार ६७९ तर अर्धापूर व भोसी परिसरातील शेतकऱ्यांना उच्च तापमानासाठी हेक्टरी ४२ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. हक्काची भरपाई मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande