
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। वाशी परिसरात बुध्द प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी संस्थेच्या वाशी येथील कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. प्रदीप ढोबळे यांनी “महात्मा फुले यांची सामाजिक क्रांती” या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
त्यानंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत हर्षवर्धन यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व धम्मवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विद्यार्थी व तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
सायंकाळी प्रा. सुकुमार संघमित्र यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनसंघर्ष, बौद्ध धम्म व परिवर्तनवादी विचारांवर प्रभावी व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करण्यात येऊन आभार प्रदर्शनाने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)