
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.) : निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या गॅस तुटवड्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबत गॅस वितरण केंद्राला टाळे ठोकून निषेध नोंदविला.
गावात भारत गॅस कंपनीची एजन्सी कार्यरत असून, मागील एक महिन्यापासून गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेला गॅस उपलब्ध नसल्याने विशेषतः महिलांवर याचा मोठा परिणाम झाला असून अनेक घरांमध्ये पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
दररोज गॅस वितरण केंद्रावर फेऱ्या मारूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. अखेर उपसरपंच जगदीश लोभे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी एकत्र येत वितरण दुकानाला टाळे ठोकले.
यावेळी नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल. गावातील या गंभीर समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis