
लंडन, 14 एप्रिल (हिं.स.)विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅकने मिचेल स्टार्कला जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून घोषित केले आहे. त्याने २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि ॲशेस मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. नोव्हेंबरमध्ये मायदेशात भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयात प्रमुख भूमिका बजावल्याबद्दल दीप्ती शर्माला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले.
अल्मॅनॅकच्या १६३ व्या आवृत्तीच्या प्रकाशनापूर्वी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ३६ वर्षीय स्टार्कने यावर्षी ११ कसोटी सामन्यांमध्ये १७.३२ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ नऊ धावांत सहा विकेट्स घेण्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे. त्यानंतर त्याने २०२५-२६ ॲशेसच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आणि मालिकेत १९.९३ च्या सरासरीने ३१ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दीप्ती शर्मा भारताची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरली. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करून भारताने प्रथमच ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. संपूर्ण स्पर्धेत तिवे ३०.७१ च्या सरासरीने २१५ धावा केल्या आणि २०.४० च्या सरासरीने २२ विकेट्सही घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात तिने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि ५ विकेट्स घेत आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता.
यावेळी भारतीय पुरुष क्रिकेटपटूंनाही मोठे स्थान मिळाले आहे. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांचा विस्डेनच्या 'वर्षातील ५ सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूं'मध्ये समावेश करण्यात आला आहे. या सर्वांनी गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या २-२ अशा बरोबरीत सुटलेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे