
मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)।मुंबईतील मेट्रो लाईन 2B च्या बांधकामादरम्यान बुधवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरातील एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ काम सुरू असताना 400 टन क्षमतेचा मोबाईल क्रेन अचानक पलटला. हा क्रेन प्रीकास्ट बीम उचलण्याचे काम करत होता, त्याच वेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.
हे काम ठेकेदार कंपनी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड करत होती, तर प्रकल्पावर देखरेख मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे.या घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर परिसरातील वाहतूक वळवण्यात आली, जेणेकरून बचाव आणि क्रेन हटवण्याचे काम सुरळीतपणे करता येईल.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पलटलेला क्रेन हटवण्यासाठी 600 टन क्षमतेचा आणखी एक मोठा क्रेन मागवण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, एमएमआरडीएने सांगितले आहे की, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जात असून शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode