बीड जिल्ह्याच्या विकासाला गती; सुनेत्रा पवार यांच्याकडून विविध विकासकामांच्या निधीला मंजुरी
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०२५-२६ या वर्षाकरिता विविध नाविन्यपूर्ण विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, विद्यमान पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती
बीड जिल्ह्याच्या विकासाला गती; सुनेत्रा पवार यांच्याकडून विविध विकासकामांच्या निधीला मंजुरी


बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०२५-२६ या वर्षाकरिता विविध नाविन्यपूर्ण विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, विद्यमान पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती दिली आहे. माजी पालकमंत्री अजित पवार यांनी आखलेल्या विकास आराखड्याची आणि स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी समर्थपणे पेलली असून, जिल्हा प्रशासनाने कोट्यवधींचा निधी विविध लोकोपयोगी कामांसाठी वितरित केला आहे. या प्रक्रियेत कामांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी १५ लाख रुपयांच्या किमान मर्यादेचा महत्त्वपूर्ण नियम लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे छोट्या तुकड्यांऐवजी मोठे आणि दर्जेदार प्रकल्प उभे राहण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बीड येथील भव्य तारंगण आणि विज्ञान उद्यानासाठी १४ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेण्याच्या उद्देशाने इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा' आणि भारतीय अंतराळ संस्था 'इस्रो' च्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी २३ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील १२ शाळांना 'आदर्श शाळा' म्हणून विकसित केले जाणार आहे. तसेच १७७ अंगणवाड्यांच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी १२ कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासांतर्गत विमानतळ प्रकल्पाचा तांत्रिक सर्वेक्षण अहवाल आणि नवीन जिल्हा ग्रंथालयाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत 'उमेद' अभियानांतर्गत पॅकेजिंग मशिनरी आणि विविध तालुक्यांत बचत गट भवनांची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन ४७ ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी शेडसाठी ४ कोटी ९ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन या सर्व कामांचा नियमित आढावा घेत असून, प्रशासनाच्या या वेगवान हालचालींमुळे जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande