लातूर - नोंदणी करूनही २ हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होईना
लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.)। लातूरच्या आडत बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. जिल्हयातील २३ हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली. या हमीभाव खरेदी केंद्रावरचा बारदाना ८
हरभरा खरेदी


लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.)। लातूरच्या आडत बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. जिल्हयातील २३ हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली. या हमीभाव खरेदी केंद्रावरचा बारदाना ८ ते १० दिवसापूर्वीच संपला आहे. त्यामुळे या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प झाली आहे. याचा फटका जिल्हयातील तब्बल २ हजार शेतकऱ्यांना बसत आहे.

जिल्हयात ३ लाख ३८ हजार ५८६ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. जिल्हयात सर्वाधिक पेरा २ लाख ८२ हजार ८५८ हेक्टरवर हरभरा या पिकांचा झाला आहे.

२० एप्रिलपर्यंत बारदाना येईल

जिल्ह्यात नाफेडच्याकडून हरभरा खरेदीसाठी २३ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रावर १ ते ३१ मार्च या कालावधीत शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी नोंदणी करण्याचा कालावधी दिला होता. त्यात पुन्हा १५ एप्रिल पर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र या २३ खरेदी केंद्रावरील बारदाना संपल्याने हरभरा खरेदी ठप्प झाली आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडे हरभरा खरेदी सुरू होण्या बारदाण्याची मागणी केली आहे. सदर बारदाना दि. २० एप्रिल पर्यंत येईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांनी दिली.

हरभरा या पिकाची काढणी होऊन तो शेतमाल शेतकरी आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. शासनाने हरभरा या पिकाला ५ हजार ८७५ रूपये हमीभाव जाहिर केला आहे. मात्र आडत बाजारात हरभरा या पिकाला सरासरी ५ हजार ४०० रूपये दर मिळत आहे. आडत बाजारात शेतकऱ्यांना क्विंटल मागे ३०० ते ४०० रूपयांचा फटका बसत आहे. यामुळे शेतकरी हरभरा हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी करण्यासाठी वळाले.

आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत २३ हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रावर दि. १ मार्च ते आज पर्यंत ५ हजार ६०८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन हरभरा पिकाची नोंदणी केली आहे. त्यापैकी हरभरा खरेदीसाठी ४ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना एसएमएसही पाठवण्यात आले. त्यानुसार आज पर्यंत ३ हजार १२४ शेतकऱ्यांचा ३६ कोटी ५५ लाख ९७ हजार ७२५ रूपयांचा ६२ हजार २२९ क्विटल हरभरा हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी झाला आहे. मात्र गेल्या ८ ते १० दिवसापासून या हमीभाव खरेदी केंद्रावरील बारदाना संपल्याने हरभऱ्याची खरेदी ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हमीभाव केंद्रावर नोंदणी करूनही आडचण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande