
बीड, 15 एप्रिल (हिं.स.)। जुन्या पेन्शनची सर्व वैशिष्ट्ये असलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसह विधानसभेच्या पटलावर मान्य केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे राज्यातील सतरा लाख संतप्त राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जिल्ह्यातील कर्मचारी शिक्षकांनी संप यशस्वी करावा असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने केले आहे.
याबाबत समन्वय समितीने म्हटले आहे की, पेंन्शनसाठी मार्च २०२३ मध्ये सात दिवसांचा अभूतपूर्व संप राज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांनी घडवून आणला. परिणामी जुन्या पेंन्शन योजने प्रमाणे कर्मचाऱ्याच्या 'सामाजिक' व 'आर्थिक' सुरक्षा देणारी 'पेन्शन योजना' लागू करण्याचे राज्य सरकारने मान्य केले. त्यासाठी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल स्वीकारून पेंन्शन लागू करण्यासाठी पुनश्च १४ डिसेंबर २०२३ रोजी संप करावा लागला तेंव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन सरकारने दिले. परंतु त्याबाबत सरकारकडून चालढकल सुरू होती, त्यामुळे २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला तेंव्हा कुठे जुन्या पेन्शनची सर्व वैशिष्ट्ये असलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारण्यात आली. या योजनेच्या नियम, अटी नंतर लागू करण्याचे अभिवचन देण्यात आले. परंतु ते अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्याप्रमाणे रिक्त जागा भराव्यात, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना १०-२०-३० अशा तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, विनाअनुदानित वा अंशत; अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, १० वर्षे सतत काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात या व इतर मागण्यांसाठी होत असलेल्या या संपात जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा बडे, सरचिटणीस रामचंद्र ठोसर, निमंत्रक राजकुमार कदम, बळीराम आण्णा उबाळे, गजानन जाधव, परमेश्वर राख, राजेंद्र खेडकर, एस. पी. जगताप, महादेव चौरे, महेश काळे, यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis