
लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.)। औसा तालुक्यातील गुळखेडा वाडी येथील अशोक भागवत तळेकर यांच्या घरात अचानक लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू सह घरांतील सहित्य जळून जळून खाक झाल्याची घटना औसा तालुक्यातील गुळखेडा वाडी येथे घडली.
या घरातील कुटुंब शेतीत काम व बांधकाम काम करून आपले घर चालवत होते. दररोजच्या प्रमाणे कामाला गेले असताना घरी अचानक आग लागली. हे घर बंद असल्याने सर्व नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. घरातून आगीचा धूर व ज्वाला दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रौद्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही क्षणांत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अचानक लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, फ्रिज, कपाट, तसेच जीवनावश्यक साहित्य व बांधकाम काम करत असल्याने ते सर्व साहित्य, भांडे, अन्नधान्य, कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे आगीत घर जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील भांडीकुंडी, कपडे,
अन्य साहित्य जळून खाक झाले. तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित घटनेचा तलाठी एम. ए. बिराजदार यांनी पंचनामा केला असून जवळपास अंदाजे ३ ते ३.५० लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. घरांतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने शासनाने तात्काळ लक्ष देऊन सहकार्य करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis