नांदेड - मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी
नांदेड, 15 एप्रिल, (हिं.स.)। रब्बी हंगामातील मका व ज्वारी या भरडधान्य पिकांची शासकीय हमीभावाने खरेदी १ मेपासून सुरू होत आहे. यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत नोंदणी सुरू होईल. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्य
नांदेड - मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी


नांदेड, 15 एप्रिल, (हिं.स.)। रब्बी हंगामातील मका व ज्वारी या भरडधान्य पिकांची शासकीय हमीभावाने खरेदी १ मेपासून सुरू होत आहे. यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत नोंदणी सुरू होईल. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक व्यवस्थापक प्रफुल्ल एस. सोयाम यांनी केले आहे.

यंदा तालुक्यात मक्याची विक्रमी पेरणी झाली असून तब्बल १० हजार १७३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण १५ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी बहुतांश क्षेत्र किनवट तालुक्यात असल्याने तालुका मका उत्पादनात आघाडीवर आहे.

शासनाने ज्वारीसाठी प्रति क्विंटल ३,६९९ रुपये, तर मक्यासाठी २,४०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात मका केवळ १४०० ते १५०० रुपये आणि ज्वारी सुमारे २००० रुपयांनी विकली जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

सरासरी ४० क्विंटल उत्पादन अपेक्षित असून, एकूण उत्पादन ४ ते ५ लाख क्विंटलपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तसेच, रब्बी ज्वारीची २ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, हेक्टरी १८ ते २० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे ४७ ते ५२ हजार क्विंटल ज्वारी उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरेदी केंद्रे सुरू लवकरात लवकर सुरू करावीत, यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आमदार भीमराव केराम यांच्या पुढाकारातून चिखली व जलधारा येथे खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून १ मे ते ३० जून दरम्यान प्रत्यक्ष खरेदी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande