
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी अत्यंत न्याय्य असून, या मागणीसाठी १७ एप्रिल २०२६ रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आरक्षण एल्गार मोर्चाला' जाहिर पाठिंबा असल्याचे अधिकृत पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी 'सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती'ला दिले आहे.
पत्रात म्हटले आहे, मुस्लिम समाजातील मागास व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. समाजाला समान संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर, सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने १७एप्रिल रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेत बळीराम गवते यांनी म्हटले आहे, मुस्लिम समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने आणि सकारात्मक दृष्टीने पाहून ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे.
लोकशाही मार्गाने आणि शांततामय पद्धतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा शासनाचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरेल. या न्याय्य लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्णतः पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळे १७ एप्रिल रोजी निघणाऱ्या मोर्चाला मोठी ताकद मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis