
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)।
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरण चर्चेत असताना तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला वारंवार फोन करून शारीरिक सुखाची मागणी केल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा महामंत्री तथा भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
रुपेश राऊत (५०, रा. गुरूदेवनगर) असे या आरोपीचे नाव असून तो विश्व हिंदू परिषदेचा अमरावती जिल्हा महामंत्री असल्याचे सांगितले जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला आहे. त्याने ३६ वर्षीय महिलेला मध्यरात्री तिच्या मोबाईलवर वारंवार फोन केले. तुझ्याशी सविस्तर बोलायचे आहे, असे सांगूनमहिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. दुसऱ्या दिवशी ही महिला त्याचे घर शोधत त्याच्याकडे पोहचली. महिलेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला. एवढ्या रात्री फोन का केला, असे विचारले. त्यावेळी त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला, असा पीडित महिलेचा आरोप आहे. आरडाओरड केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता केल्यास तुझ्या मुलाचे काही खरे नाही, अशी धमकी त्याने दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे.काही वर्षांपुर्वी पतीचे निधन झाल्याने महिला ही दोन मुलांसह गुरूदेवनगर येथे वास्तव्याला असून किरकोळ व्यवसाय करते. घर घ्यायचे असल्याने काही वर्षांपूर्वी तिची रुपेश याच्यासोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने महिलेशी मोबाईलवर अश्लील संभाषण केले. महिलेने त्याचे घर गाठून विचारणा केल्यावर आरोपीने अत्याचाराचा प्रयत्न केला.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीच्या घराला कुलूप लागलेले आढळले. त्याला शोधण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे. त्याच्या शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल.
गोपाल उपाध्याय, पोलीस निरीक्षक, तिवसा
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी