लातूर जिल्ह्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी गतीमान करण्याचे निर्देश
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.) : नागरिकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


लातूर, 17 एप्रिल (हिं.स.) : नागरिकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड तयार करून त्याचे वितरण अधिक वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अभिमन्यू पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महापालिका आयुक्त मानसी मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आरएमओ डॉ. अशोक सारडा आणि जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य कवच देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनांद्वारे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांपर्यंतची तरतूद तसेच ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिक पाच लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आयुष्मान भारत कार्ड आणि वयवंदना कार्डांचे निर्माण व वितरण युद्धपातळीवर करण्याच्या सूचना पालकमंत्री भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सविस्तर माहिती सादर केली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande