
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.) : अमरावती येथील गंभीर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देत सार्वजनिकरित्या फाशी देण्याची मागणी जोर धरत असतानाच या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळू लागले आहे.
शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲड. फैजान मिर्झा यांनी खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस तपास आणि अल्पसंख्यांक आयोगाच्या चौकशीत संबंधित मुलगी मुस्लिम समाजातील असल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या संदर्भात नवनीत राणा यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदार आणि आक्षेपार्ह असल्याचा आरोप मिर्झा यांनी केला. आरोपीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे नमूद करत त्यांनी कोणत्याही समाजाबाबत चुकीची माहिती देणारी विधाने करणे अयोग्य असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मिर्झा यांनी केली आहे.
एकीकडे आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे