
परभणी, 17 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, तसेच टेबल टेनिस व बॅडमिंटन जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होत आहे.
खेळाडूंना आधुनिक व जागतिक दर्जाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे यासाठी तज्ञ प्रशिक्षकांना पाचारण करण्यात आले असून, शिबिरात राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिरात टेबल टेनिस, बॅडमिंटन व खो-खो या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. टेबल टेनिसचे प्रशिक्षण सिटी क्लब, स्टेशन रोड येथे, बॅडमिंटनचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये, तर खो-खोचे प्रशिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय, वसमत रोड येथे होणार आहे. हे प्रशिक्षण दि. २४ एप्रिल २०२६ ते ३ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
खो-खोचे प्रशिक्षण सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत होईल. बॅडमिंटनचे प्रशिक्षण दुपारी ३.०० ते ४.०० वाजेपर्यंत असून, खेळाडूंनी आवश्यक साहित्य स्वतः सोबत आणणे आवश्यक आहे. टेबल टेनिसचे प्रशिक्षण सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत होणार आहे.
या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे व राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संजय मुंढे (९४२२१७८००९), चेतन मुक्तावार (टेबल टेनिस प्रशिक्षक) – ९७६६६७९६३६, उन्मेश गाडेकर (बॅडमिंटन प्रशिक्षक) – ८६२३९३५६७९ यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis